सरकारचं नवं सायन्स; दारुच्या दुकानात कोरोना येत नाही; भाजप नेत्याची खोचक टीका !
चंद्रपूर (वृत्तसंस्था)। राज्य सरकारला लॉकडाऊनच्या काळात मंदिराऐवजी दारु दुकाने सुरु करायची गरज वाटली. दारुच्या दुकानात कोरोना येत नाही, असं राज्य सरकारचं नवं सायन्स असावं, अशी खोचक टीका भाजपनेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्यातली मंदिरं सुरु करण्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. मात्र राज्य सरकारला मंदिराऐवजी दारु दुकाने सुरु करण्यात रस असल्याचं दिसून आलं, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. काही राज्यांनी मंदिरे सुरु केली आहेत. मात्र राज्यात मंदिराऐवजी दारु दुकाने सुरु झाली. कदाचित मंदिरातून कोरोना पसरतो आणि दारु दुकाना तो येत नसावा, असं सरकारचं नवं सायन्स असावं, उपरोधक टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केंद्रात नवी भूमिका वठवण्याचा ‘सामना’ दैनिकातून देण्यात आलेल्या सल्ल्यावर मुनगंटीवार म्हणाले की, अजूनही मुख्यमंत्रिपदाचं महत्त्व आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीत झाली नाही, त्यात असा सल्ला देणं, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना दिल्लीला पाठवून आतमधल्या कुणाची तरी त्या पदावर नजर आहे. यात काही तरी गडबड असल्याचा संशयही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला केला आहे. ‘तीन तिघाडा काम बिघाडा’, असं हे सरकार असून बदल्या तसेच इतर कामासाठी आपापसात भांडणाऱ्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, अशी घणाघाती टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.