पोलीस आजपर्यंत झोपले होते का? अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील बरसले
मुंबई (वृत्तसंस्था): पत्रकार अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांननी अटक केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण 2018चं प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना अर्णव गोस्वामी प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांना धारेवर धरले आहे. भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे. 2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावं आणि आंदोलने करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं. अर्णव अटक प्रकरणी सोशल मीडियावरूनही आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो असं या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.