बेळगाव झांकी है, मुंबई अभी बाकी है; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, प्रतिनिधी : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेला इशारा दिला आहे. बेळगाव झांकी है, मुंबई अभी बाकी है, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांसी संवाद सादला. यावेळी त्यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या निकालावर भाष्य केलं. बेळगाव झांकी है, मुंबई अभी बाकी है आणि ती आम्ही मिळवणारच. ज्या पद्धतीने आम्ही हैदराबादची निवडणूक लढलो. १-२ नगरसेवकावरुन ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कर्नाटकमध्ये तीन ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. बेळगाव, हुबळी आणि कलबुर्गी, या तिन्ही ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी शंका व्यक्त केली. निकाल जेव्हा चांगले असतात तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निकाल जेव्हा त्यांच्या विरोधात येतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना गडबड दिसते. ही प्रतिक्रिया त्यांच्या स्वभावानुसार आली. त्यांच्याच नव्हे सर्व विरोधकांच्या स्वभावानुसार आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण ३३ जागांसह बेळगाव महानगरपालिकेत भाजपला सप्ष्ट बहुमत मिळालं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं पानीपत झालं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार फक्त चारच जागांवर विजयी होऊ शकले आहेत.