कोरोना पाठोपाठ आता झिका व्हायरसचे सावट; राज्यात आढळला पहिला रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, वृत्तसंस्था। कोरोना विषाणूच्या कचाट्यातून अजून राज्य सावरतंय न सावरतंय तोवरच आता झिका या नव्या विषाणूचं संकटही राज्यावर घोंगावू लागलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या एका गावात या विषाणूचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा तात्काळ कामाला लागली आहे. झिका विषाणू जीव घेणा नसला तरी तरी महिलांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाला घाबरुन न जाता जास्तीत जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे. पण त्या आधी हा आजार आणि त्याविषयी काही प्राथमिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.
काय आहे झिका विषाणू?
या विषाणूमुळे होणारा आजार हा एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.
या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घेता येईल?
घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरला आहे. तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.घरामध्ये व परिसरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये व उघडे ठेवू नये, हा आजार संसर्गजन्य नाही.या विषाणूचा धोका महिलांना जास्त आहे. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका व्हायरसचा नवा रुग्ण आढळला आहे. ५० वर्षी महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या या रुग्णाची हिस्ट्री तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच बेलसरमध्ये तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. आवटे यांनी दिली आहे. बेलसर हे पुरंदर तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ताप रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने दिनांक १६ जुलैला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे झाल्याचे समोर आले. मग २७ ते २९ जुलै या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्यू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीम बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे ब्लड सॅपल घेतले. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू आजार असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून स्पष्ट झाले असून बेलसर गावातील एका ५० वर्षाच्या महिलेस झिका व्हायरस आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलैला प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा