बेड मिळाला नाही म्हणून प्रवासी निवाऱ्यात थांबले! अन् पत्नीच्या उशालाच तडफडत पतीने प्राण सोडले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चंद्रपूर (वृत्तसेवा) : कोरोना आणखी किती बळी घेणार हा प्रश्न तर अनुत्तरीत आहेच, मात्र आणखी किती हाल, किती अवहेलना आणि मृत्यूचे किती कुरूप चेहरे तो आपल्याला दाखवणार हे कळेनासं झालं आहे. एखाद्या दुःखद घटनेनंतर मन सुन्न होणं म्हणजे काय असतं ते पुढील मनाला चटका लावणारी घटना समजल्यानंतर आपलंही मन हेलावून जाईल ,सुन्न होईल चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी शहरात असाच मृत्यूचा एक विद्रूप चेहरा आज रविवारी पाहायला मिळाला. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अंभोरा येथील 50 वर्षीय गोविंदा निकेश्वर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांची पत्नी त्यांना चंद्रपूरला घेऊन आली
चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी शहरात आल्यानंतर त्यांनी अनेकठिकाणी प्रयत्न केले, पण त्यांच्या पतीवर उपचार करण्यासाठी त्यांना कुठेच बेड मिळाला नाही. कित्येक तास एका- एका श्वासासाठी झगडत असलेल्या पतीला घेऊन त्या फिरत राहिल्या, वणवण फिरूनही कुठेही बेड मिळाला नाही.बेड न मिळाल्यानं अखरे रात्र कुठं घालवायची तर शहरातल्या ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या एस.टी. प्रवासी निवाऱ्याचा आसरा त्यांनी घेतला. पण यावेळी गोविंदा निकेश्वर यांची तब्येत अधिकच खालावली होती. कोरोनाने स्थिती गंभीर झालेली आणि उपचार मिळत नसल्याने अगदी एकेका श्वासासाठी त्यांचा लढा चालला होता. संपूर्ण रात्र अशीच तडफडत निघाली पण जीवन मृत्यूच्या या संघर्षात अखेर काळानं बाजी मारली आणि सकाळी इथंच गोविंदाने तडफडून-तडफडून प्राण सोडले..
ज्या कुटुंबानं घरातला कर्ता पुरुष गमावला त्यांच्यासाठी ,त्या कुटुंबासाठीच काय, पण आपल्या देशात अशाप्रकारे एखाद्याचा केवळ उपचारा अभावी तडफडून-तडफडून अक्षरश: रस्त्यावर मृत्यू होत असेल तर ती संपूर्ण देशासाठीच आपत्ती म्हणावी ?
ब्रह्मपुरीचे माजी आमदार आणि भाजप नेते अतुल देशकर यांनी ही घटना सरकारचा निष्काळजीपणा दर्शवत असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मंत्री राजीनामा देतील किंवा नाही, हा राजकारणाचा भाग आहे. पण नवऱ्याला बरं करण्यासाठी शहरात उपचारा साठी घेऊन आलेली गोविंदाची पत्नी परत एकटी सुन्न मनाने घरी जाताना तिच्या मनात काय वादळ असेल, आणि अशी किती वादळं रोज मनातल्या मनातच दबली जातायेत हा सर्वात गंभीर आणि विचार करण्याचा मुद्दा आहे.