राज्यात नवे नियम; ३१ ऑगस्ट पर्यंत लॉकडाउन वाढवला !
मुंबई (वृत्तसंस्था)। केंद्राने अनलॉक ३ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर त्याआधारे राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा कसा असेल हे जाहीर केलं आहे. केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर राज्य सरकारनंही पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसंच, १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे. सराकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात काही बदल करण्यात आले असून मॉल्स आणि मार्केट ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिशन बिगिन अंतर्गंत निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन दरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार ?नव्या आदेशा नुसार राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासोबत मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व उद्योगांना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे. दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.अत्यावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील. गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल मात्र बंदच राहणार आहेत. लग्न समारंभसाठी सरकारनं २३ जूनला जारी केलेले आदेश कायम असणार आहेत.