भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

काशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात काय संबंध?; गोसावीचे चॅट शेअर करत मलिकांचा नवा गौप्यस्फोट

मुंबई, प्रतिनिधी : क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईवरुन नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप आणि पुरावे सादर करुन समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. केपी गोसावी आणि खबरीचे व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे संबंध काय आहेत? असा सवाल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळीच ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच एनसीबीवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. मुंबई येथे एनसीबीने छापा टाकल्यानंतर चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्याविषयीचे व्हॉट्स ॲप चॅट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता व्हायरल केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी हे चॅट व्हायरल केले असून हे चॅट के. पी. गोसावी आणि खबऱ्यातील आहेत. लोकांना कसे अडकवायचे याचे संभाषण त्यात आहे. मला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं. त्यानुसार व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे. त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे. केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात. त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो. ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतलं गेलं. त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही? तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

काशिफ खान हा गोव्यात लपून बसला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना त्यांच्याकडे गोव्याचा चार्ज होता. गोव्यात ड्रग्ज टुरिझम चालतं हे जगभरातील लोकांना माहीत आहे. रशियन माफीया हे ड्रग्जचं रॅकेट चालवतात. पण गोव्यात कोणतीही कारवाई होत नाही. कारण काशिफ खानकडून गोव्यात हे रॅकेट चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काशिफवर कारवाई होत नाही. तुम्ही काशिफ खानला का बोलवत नाही? व्हाईट दुबईला का अटक झाली नाही? अशी माझी तुम्हाला विचारणा आहे, असं मलिक म्हणाले. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत अशी विचारणा देखील आता नवाब मलिक यांनी केली. काशीफ खानच्या विरोधात पुरावे देऊनही त्याला अटक का केली जात नाही? असे एक ना अनेक सवाल आता अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. हे चॅट व्हायरल करताना ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना आहे. त्यांना उत्तर द्यावे लागेल असेही मलिक यांनी लिहिले आहे.कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य संशयितांना अटक केली होती. त्यानंतर या छाप्यावर संशय व्यक्त करत नवाब मलिक यांनी अनेक दावे केले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!