धनंजय मुंडे प्रकरणी नवा ट्विस्ट’ ती मला ही ब्लॅकमेल करत होती’ भाजप नेत्यांची पोलिसांत तक्रार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी) : विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिल्यानंतर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. एकीकडे यासंदर्भात राष्ट्रवादीची पक्षांतर्गत बैठक सुरू असली, तरी दुसरीकडे मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलीस तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरोधात माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. ‘रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला आहे,’ असं हेगडे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळू शकतं.
कृष्णा हेगडे हे माजी आमदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. हीच महिला धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत होती. अंधेरीच्या अंबोली पोलीस स्टेशनमध्ये कृष्णा हेगडे यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार त्यांनी रेणू शर्मा आपल्यालाही सतत फोन आणि मेसेज करून तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती, असं म्हटलं आहे.
‘रेणू शर्मा नावाची महिला मला 2010 पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळं टाकून त्यात भुलवून ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो’, असं हेगडे यांनी म्हटलं आहे. हेगडे यांच्या पत्रानुसार, रेणू शर्माने त्यांना 6 आणि 7 जानेवारीला पुन्हा एकदा मेसेज केले होते. ‘पण मी उत्तर द्यायचं टाळलं आणि फक्त इमोजी पाठवला’, असंही हेगडे यांनी त्यावर म्हटलं आहे. ‘ती महिला अशा प्रकारे हनी ट्रॅपिंगमध्ये अडकून अनेकांची फसवणूक करू शकते. तिने मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, उद्या दुसऱ्या कोणाला अडकवेल. म्हणून पोलिसांनी या प्रकरणी ब्लॅकमेलिंगची केस नोंदवून घेऊन तिच्याविरोधात FIR दाखल करून घ्यावी,’ अशी विनंती हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात केली आहे.