मोठी बातमी : तब्बल २०६२ जागांसाठी शिक्षक भरती– शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राज्यातील शिक्षकपद भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात 2062 रिक्त पदं भरण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ही शिक्षकपद भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डीएलएड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.
याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच घोषणा केलीय. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
शिक्षक पदभरती:
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!#teacherrecruitment @CMOMaharashtra @INCMaharashtra— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 2, 2021
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा