एकनाथ खडसेंना निर्णय घ्यावा लागेल शरद पवारांचे मोठे विधान !
उस्मानाबाद (वृत्तसंस्था): भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सध्या रंगली आहे. अशात खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.
याबाबत अधिक असे की, उस्मानाबाद मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशावर भूमिका स्पष्ट केली. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले, ‘गेली 25 वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु: ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काही करता येणार नाही’ असं सूचक विधानही पवारांनी केले.