वेळीच सतर्क व्हा; ऑक्सी पल्स मीटरचा ‘हा’ व्हॉट्सअॅप मेसेज आलाय, सावध राहा !
मुंबई (वृत्तसंस्था)। कोरोना विषाणूंने सर्वत्र थैमान माजवले असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्व शासकीय यंत्रणाही अहोरात्र झटून काम करत आहेत. अशावेळी सायबर भामटेही मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असून सायबर पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ऑक्सी पल्स मीटर संदर्भात गेले काही दिवस एक फेक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला असून या फसव्या व्हॉट्सअॅप मेसेजला बळी पडू नका व सायबर भामट्यांपासून सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामाने केले आहे.
मागील काही दिवसांपासून ऑक्सी पल्स मीटरबाबत एका फसव्या मेसेजने व्हाट्सअप्पवरती धुमाकूळ घातला आहे. एक विशिष्ट मोबाइल ॲप डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले बॉडी पल्स (body pulse) व रक्तातील ऑक्सिजनचे (oxygen) प्रमाण मोजू शकता व त्याकरिता स्वतंत्ररित्या पल्स ऑक्सी मीटर (pulse-oxy meter) हे उपकरण घ्यायची गरज नाही, असा व्हॉट्सअॅप मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये मोबाइल ॲप डाउनलोड करायची लिंकही दिलेली आहे. मात्र, हा मेसेज फेक असून कोरोना महामारीच्या काळात अशा फसव्या मेसेजपासून सावधान राहावे, महाराष्ट्र सायबर ने म्हटले आहे की, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाइल ॲप्स वरून ऑक्सिजनच्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात, मुळात पल्स ऑक्सी मीटर या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली व या मोबाइल ॲपमधील सॉफ्टवेअर यामध्ये बराच फरक आहे. त्या प्रणालीमध्ये जे वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत ते या मोबाइल ॲपमध्ये नाहीत, असे मोबाइल ॲप सुरक्षित नाहीत व त्यांचा उपयोग सायबर भामटे तुमच्या मोबाइलमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात, शक्यतो असे मोबाइल ॲप डाउनलोड करून वापरणे टाळावे. सायबर भामट्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून त्याचवेळी नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.