गोपीचंद पडळकर, खोत यांची एसटी कामगार संपातून माघार !
मुंबई, प्रतिनिधी : राज्यभर एसटी कर्मचारी आपल्या मागण्यापूर्ण करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, तसेच त्यांच्या मागण्यापूर्ण करण्यासाठी भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर पुढे आले. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांसोबत खोत आणि पडळकर उभे असल्याचे दिसत आहे. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून खोत आणि पडळकरांनी काढता पाय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी पुढील आंदोलनाचा निर्णय घ्यावा, आंदोलनातून माघार घेतली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केले होते. आम्ही दोघांनी पाठिंबा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून या कामागारांची मागणी होती की, शासनांच्या कर्मचाऱ्यांच्याबरोबरीने पगार आम्हाला दिला पाहिजे, वेळेत पगार दिला पाहिजे, सातव वेतन लागू केले पाहिजे या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या होत्या. परंतु सरकारने या मागण्यांकडे डोळे झाकपणा केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि विलिनीकरण झाल्यामुळेच चांगला पगार मिळू शकतो, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा पगार मिळू शकतो ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर संघटना विरहित संपाला कर्मचाऱ्यांनी हाक दिली.’ ‘कर्मचारी एकाएकी पडता कामा नये, कारण या कर्मचाऱ्यांच्या वरती गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत आलेला आहे. त्यांच्या आत्महत्या एका बाजूला होत आहेत आणि तुटपुंज्या पगारात, त्यांचा घरखर्च असेल किंवा इतर मुलांचे शिक्षण असेल, दवा-पाणी असेल हे भागत नव्हते.
सरकार यांच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आम्ही आझाद मैदानावरती १६ दिवस या कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी ठाण मांडून बसलो. १५ दिवसांनंतर सरकारला जाग आली आणि चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेमध्ये एका बाजूला विलिनीकरणाचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे जे वकील लढत आहेत, त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई देखील लढू. पण न्यायालयाचा निर्णय येईलपर्यंत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याबाबतचा सरकारने निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थांने हा निर्णय पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे यश असल्याचे आम्ही समजतो. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार १७ हजार रुपये मिळत होता, त्या कर्मचाऱ्यांना आता २४, ५९५ रुपये पगार गेला आहे. पहिल्या टप्प्यातील हा कर्मचाऱ्यांचा विजय आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल त्यानंतर जो काही आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होईल तो कर्मचाऱ्यांनी उभा केला तर आम्ही निश्चिपणे त्याच्या खांद्याला खाद्या लावू उभे राहू,’ असे सदाभाऊ खोत म्हणाले.