१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून आग्रह नाही – राज्यपालाची गुगली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : विधान परिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून राज्यसरकारने मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये या विषयावरुन आरोप प्रत्यारोप चालू असतात, त्यावर राज्यपाल यांनी सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता? असं म्हणत गुगली टाकली आहे.
स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज पुणे आयुक्त कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे इत्याही उपस्थिती होते. राज्यपाल कोश्यारी मान्यवरांच्या भेटी घेत असताना शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत विचारले. यावेळी अजित पवार तेथेच उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, अजित पवार सोबत आहेत. ते माझे मित्र आहेत. राज्यसरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असे म्हणत राज्य सरकारलाच टोला लगावला. यावेळी अजित पवारांनी हसत-हसत आज स्वातंत्र्य दिन आहे या विषयावर नंतर बोलेन असे सांगिले. मात्र, याच मुद्द्यावर पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बापट म्हणाले, राज्यपालच म्हणत आहेत की सरकार आग्रह करत नाही. याचा अर्थ आघाडी सरकारच्या नेत्यांत समन्वय नाही. त्यामुळे तुम्ही काय ते समजून घ्यावे, असे बापट म्हणाले.
दरम्यान, १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की, संविधानिक पदाला आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी नावांची यादी देऊन नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही.