भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

सकाळी लग्न, संध्याकाळी कोरोना, वधू आणि वधूपिताही पॉझिटिव्ह; संपर्कातील वऱ्हाडी गायब

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

कोल्हापूर वृत्तसेवा : इचलकरंजीतील एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नवरीच्या वडिलांना कोरोना झाल्यानंतरही लग्न लावण्यात आलं. सकाळी लग्न झाल्यानंतर संध्याकाळी नवरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे लग्नातील वऱ्हाडी मंडळीचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तसेच या नवरीच्या संपर्कातील अनेक वऱ्हाडी गायब झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळाले असून या वऱ्हाडींचा कसून शोध घेण्यात येत आहे.

येथील एका मंगलकार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. धक्कादायक बाब म्हणजे वधूचे पिता कोरोना पॉझिटिव्ह असतानाही हा विवाह सोहळा झाला. त्यानंतर नवरीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. शुक्रवारी 19 फेब्रुवारी रोजी शहरात तीन नवे कोरोनाबाधित सापडले होते. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णांच्या संपर्कातील कोण कोण आले होते याची माहिती घेण्याकरिता आरोग्य पथकाचे अधिकारी या रुग्णांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यावेळी रुग्णाच्या घरी विवाह सोहळा झाल्याचं त्यांना समजलं. हा विवाह सोहळा एका मंगल कार्यालयात सुरू होता. तेथे पथक पोचल्यानंतर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियमावलीतील संख्येपेक्षा जास्त नातेवाईक उपस्थित असल्याचे दिसले. वडील कोरोना पॉझिटिव्ह असताना मुलीचा विवाह सोहळा होत असल्याने पालिका प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. याबाबत थेट नववधूचा एक नातेवाईक व मंगल कार्यालयाचा अध्यक्ष अशा दोघांविरोधात कोविड प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, विवाह सोहळ्यातील नववधूचा कोरोना अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. नववधूच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा पालिका प्रशासनाने शोध सुरू केला आहे. या सर्वांचा स्वॅब तपासणीसाठी दिला जाणार आहे. या सर्व प्रकाराची आज शहरात जोरदार चर्चा सुरू होती. तर पोलीस आणि मंगल कार्यालय महेश सेवा समिती यांच्यावर नगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचा गुन्हा नोंद होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे.

नववधूच बाधित झाल्याचे समजताच तिच्या तीव्र संपर्कात आलेले अनेक जण गायब झाले आहेत. प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. मात्र, लग्नाला हजर असलेले आणि वधूच्या संपर्कात आलेले अनेकजण शहराबाहेर गेल्याचे समोर आले. नववधूच्या संपर्कात आलेले सर्व जणच धास्तावल्याचे दिसून येत आहे. विवाहाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिका प्रशासन ठोस उपाययोजना करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!