नाशकात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; ‘गुन्हे दाखल झाले तरी रामकुंडावर पूजा करणारच’ !
नाशिक (वृत्तसंस्था)। राम मंदिराचे भूमिपूजन आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. दुसरीकडे रामाची नगरी असलेल्या नाशिकमध्येही रामायण पेटले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जिल्ह्यातील मंदिरं खुली करा, अशी मागणी आखाडे, पुरोहित संघ,विहिप, हिंदू संघटनांनी केली आहे.
5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. 200 निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने 5 ऑगस्टला मंदिरं खुली करा या मागणीवर आखाडे, पुरोहित संघ,विहिप, हिंदू संघटन ठाम आहे. अयोध्येत भूमिपूजन पार्श्वभूमीवर नाशकात रामकुंडावर महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली आहे.,
परंतु, कलम 144 लागू असल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला आहे. राज्यात आधीच कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. मात्र, परवानगी नाही दिली तरी विधिवत कार्यक्रम करणारच, या भूमिकेवर महंत ठाम आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाआरती होणारच असा पवित्रा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. नाशिकही रामाची भूमी आहे. याच ठिकाणी दंडकारण्य होतं. याच भागात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण वास्तव्य होतं. शूर्पणखेचं कापलेलं नाक या भूमीवर म्हणून नाशिक नाव झाल्याची आख्यायिका आहे. रामाच्या अनेक पुरातन मंदिराचं शहरात आहे. त्यामुळे रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनचा वाद चांगलाच पेटला आहे.