NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही– गृहमंत्री वळसे-पाटलांनी आरोप फेटाळले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली आहे. मात्र, वानखेडे यांचे हे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
दिलीप वळसे पाटील आज पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी समीर वानखेडे यांच्या तक्रारीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी हा खुलासा केला. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलीस पाळत ठेवल्याची तक्रार करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी डीजीपींकडे तक्रार केली आहे. परंतु वानखेडेंवर मुंबई पोलीस पाळत ठेवून नसल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या नसल्याचेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यावर दोन पोलीस कर्मचारी पाळत ठेवून असल्याची तक्रार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केली आहे. राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची, कमिश्नर, अधिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.