ईडी, सीबीआयनंतर आता आयकर विभागाचे अनिल देशमुख यांच्या घरी छापे !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नागपूर, वृत्तसंस्था : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर आयकर विभागानं आज पुन्हा एकदा देशमुख यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही या प्रकरणात जावे लागले. त्यामुळं संतापलेल्या सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझे व अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळं देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.
नागपूर सिव्हिल लाइन परिसरातील घरी आयकर विभागाचे अधिकारी झाडाझडती घेत आहेत. मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. असं असलं तरी देशमुख यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं तपास यंत्रणांचं काम सुरूच आहे. याचाच भाग म्हणून आज नागपूर येथील घरी छापे मारण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागानं छापे टाकले तेव्हा अनिल देशमुख व त्यांची दोन्ही मुलं घरी नव्हती. त्यांच्या पत्नी व काही खासगी कर्मचारी घरी होते. आयकर अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.