‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’ साठी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सामंजस्य करार, कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न साकार !
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि. १० मे – माजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचे दीर्घकाळाचे स्वप्न असलेल्या तापी महाकाय पुनर्भरण योजनेस आज प्रत्यक्ष दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांदरम्यान “ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा” संदर्भात ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक प्रसंगी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन हे विशेष उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील २,१३,७०६ हेक्टर तर मध्यप्रदेशातील ९६,०८२ हेक्टर क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे. एकूण ३,०९,७८८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्यापैकी ४८,००० हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पासाठी ३९.१३ TMC पाण्याचा वापर प्रस्तावित असून, ८.३१ TMC क्षमतेचा डायव्हर्जन वीअर, २२१ किमी लांबीचा उजवा कालवा आणि २६० किमी लांबीचा डावा कालवा यांचा समावेश आहे. एकूण अंदाजित प्रकल्प खर्च ₹१९,२४४ कोटी इतका असून, संपूर्ण क्षेत्राचे LIDAR तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
या ऐतिहासिक क्षणी रावेरचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडून जल्लोष केला. त्यांनी यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, मार्गदर्शक गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे आणि भाजप नेत्या आमदार अर्चना दीदी चिटणीस यांचे आभार मानले. हा प्रकल्प तापी खोऱ्यातील शेती समृद्ध करणार असून, कृषी व जलसंधारण क्षेत्रात मोलाची भर घालणारा ठरणार आहे.