नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार– शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती (वृत्तसंस्था): महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयं बंद होती. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, नववी ते बारावीचे विद्यार्थी वयाने थोडे मोठे असतात, त्यामुळे हे पहिले पाऊल आपण उचलत आहोत. सर्व माहिती घेऊनच आपण शाळा सुरु करु, अधिवेशनात जशा आमदारांच्या तपासण्या केल्या गेल्या, तशा विद्यार्थ्यांच्या करता येतील का, याबाबत चाचपणी सुरु आहे. बाधित शिक्षक शाळेत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. धोरण ठरवून नोव्हेंबरपासून शाळा सुरु करु, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.