राज्यांत मध्यावधी निवडणुका संबंधी भाजपा प्रदेशाध्यक्षाचे मोठे विधान
मुंबई (वृत्तसेवा)। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढली तरी काही फरक पडणार नाही. पुढील निवडणूक भाजप हा स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर त्यांनी मध्यावधी निवडणुकांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “मध्यावधी निवडणुका कोणालाच नको असतात. मध्यावधी निवडणुका लढणे पक्षाला आणि उमेदवाराला कठिण जात असते. मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे. मध्यावधी न होण्यासाठीच सर्वच प्रयत्न करत आहेत. पण कोणतेच कॉम्बिनेशन जमून आले नाही तर मग पर्याय उरत नाही.”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत असताना चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. “मध्यावधी न होण्यासाठीच सर्वच प्रयत्न करत आहेत. पण कोणतेच कॉम्बिनेशन जमून आले नाही तर मग पर्याय उरत नाही. आताच १० महिन्यापूर्वी निवडणूका झाल्या आहेत, त्यामुळे पुन्हा निवडणूक म्हटली की युती-आघाडी, पुन्हा तिकीट हा सगळा व्याप कुणालाच नको आहे. त्यातून आपण पुन्हा निवडून येऊ का? असा संभ्रम उमेदवारांच्या मनात असतो. मध्यावधी कुणालाच नको असतात पण अस्थिरतेचे समाधान काय? हे देखील कुणालाच लक्षात येत नाही आहे.”
शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर गेले दोन दिवस राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. दोन्ही पक्ष नक्की काय भूमिका घेणार? याची उत्सुकता लागली आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, “या भेटीतून फार काही निष्पन्न झालेले नाही. दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय चर्चा नक्कीच झाली असेल. पण त्यामुळे ही भेट फार काही राजकीय घडामोड घडवेल असे मी तरी मानत नाही.”