…अन्यथा आम्ही वीज कंपन्यांना झटका देऊ, वाढीव वीज बिलांवरुन– राज ठाकरेचां इशारा
मुंबई (वृत्तसंस्था)। राज्याला महसूलाची अडचण आहे हे सर्वांना माहितच आहे. पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडण हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच तफावतीच्या नावाखाली जी वीजबिले ग्राहकाच्या माथी मारण्यात येत आहेत ती लूटच म्हणावी लागेल. कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील पण ह्या अशाा विषयांत जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने घेऊ नये असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे.
खाजगी कंपन्या तसेच सरकारी वीज कंपन्यांनी राज्यातील वीज ग्राहकांना बिलाचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची वीजबिले ही सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. सरासरी वीजबिलाची तफावत सामान्य ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. एकप्रकारे ही लूट असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापना गेल्या ३ महिन्यांपासून बंद आहेत. तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासव्वा बिल आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे, तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरू केली आहे. अशावेळी जिथे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना दिलेली वीजबिले म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावर प्रहार करण्यासारख असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.