मुख्यमंत्र्यांकडून 5476 कोटींच्या मदतीची घोषणा; महिन्यांचा गहू, तांदूळ मोफत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी 5476 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार. तसेच शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देणार आहे. तसेच सरकारी योजनेचे नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये देण्यात येणार असून बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच अधिकृत फेरिवाल्यांनाही दीड हजार रुपये देणार आहे. परवानाधारक रिक्षाचलाकांनीही दीड हजार रुपये, आणि खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासींनाही 2 हजार रुपये देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध वर्गातील नागरिकांना आर्थिक पॅकेजची घोषणा केली. राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार. पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार, तसेच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. त्याचा 12 लाख कामगारांना उपयोग होणार आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. त्याशिवाय घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असून अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.