विद्यार्थ्यांना मारहाणी प्रकरणी सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था)। धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली. त्यामुळे या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच असून सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
आपल्या रास्त मागण्या पालकमंत्र्यांना सादर करण्यास धुळे येथे अभाविपचे कार्यकर्ते गेले होते. दोन दिवस विनंती करूनही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट नाकारली. त्यामुळे त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पोलिसांकरवी मारहाण करणे हा मस्तवालपणा आहे, असा संताप चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण काही करत असल्याचा दिखावा महाविकास आघाडी सरकार करत असते. या आघाडीचे मंत्री त्या संदर्भात पंतप्रधानांकडे मागण्याही करतात. पण प्रत्यक्षात आज पोलिसांनी निवेदन देणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामुळे या सरकारचा मुखवटा फाटला आहे व मस्तवाल चेहरा दिसला आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करावी तसेच या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सहानुभूतीने दखल घ्यावी, अशी मागणीही पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.