भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मुसळधार पावसाने भिंत व दरड कोसळून तीन दुर्घटना, १८ जणांचा बळी !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत १८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई येथील चेंबूर परिसरात मध्यरात्री दरड कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर विक्रोळीत ३, तर भांडुपमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस मुंबईच्या अनेक भागांमध्ये झाला. या पावसामुळे अनेक भागांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरले. मात्र, चेंबूरमध्ये भारत नगर परिसरात मध्यरात्री मुसळधार पाऊसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तर दुसरीकडे विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच भांडुप परिसरात वनविभागाची भिंत कोसळली आहे. यात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली असून अजूनही कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!