मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरुन युतीचे संकेत?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन :
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात युतीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘आजी – माजी व एकत्र आले तर भावी सहकारी’ अशी केली आणि व्यासपाठीवरील नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपाठीवरील ‘आजी – माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी ‘ अशी केली होती. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘राजकारणात कधी काहीही होतं असतं. आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पडत आहोत. तसंच, ही जी अनैसर्गिक आघाडी तयार झाली आहे, हे फार काळ टीकणार नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
आजच्या वक्तव्याचा आपण एकच अन्वयार्थ काढूया की मुख्यमंत्र्यांना लक्षात आलं असेल की ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवतायेत. सरकारमध्ये किती भ्रष्टाचार होतोय, हे सगळे त्यांच्या लक्षात आलं असेल त्यामुळं आपण त्यांना शुभेच्छा देऊयात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच, भाजपा सरकार बनवण्याच्या मानसिकतेत अजिबात नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. महाराष्ट्रातील लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या घेऊन सरकारपुढे आंदोलन करतोय. सरकारचं उत्तरदायित्व सरकारला भाजप शिकवते आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.