विरोधी पक्षाच्या ‘त्या’ कला मलाही अवगत; खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
वृत्तसंस्था, अहमदनगर: ‘आधी छोटा आरोप करायचा, मग कोणाला तरी पुढे करून तक्रार करायला लावायची, मग त्यांची चौकशी सुरू करायची. असे करीत एखाद्याला पूर्ण बदनाम करायचे. आरोपांत तथ्य नसले तरी मीडिया आणि यंत्रणांच्या मदतीने प्रकरण पेटते ठेवायचे, या विरोधी पक्षाच्या कला असतात. यासाठी प्रचंड बुद्धीमत्ता लागते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या तेच करीत आहेत. मीही बराच काळ विरोधी पक्षात होतो, त्यामुळे या कला मलाही अवगत आहेत. फडणवीस मला ज्युनिअर आहेत,’ असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.,’ असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
खडसे नगरला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. ‘मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप. त्यावरून भाजपने घेतलेली भूमिका यावर त्यांनी मते मांडली. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी योग्य आहे का, यावर थेट उत्तर देणे मात्र खडसे यांनी टाळले. पैशाच्या मागणीसंबंधी झालेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, ‘सिंग यांनी पदावर असताना आरोप करायला हवे होते. पोलिसांत बदल्यांसाठी पैसे घेतले जातात, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, पोलिसांच्या बदल्यांसाठी आस्थापना मंडळ असते. त्यांच्या शिवाय बदल्या होऊ शकत नाहीत. या मंडळात वरिष्ठ अधिकारीही असतात. जर पैसे घेतल्याचा आरोप होतो आहे, तर मग हे त्या आस्थापना मंडळासाठी होते का? याची चौकशी झाली पाहिजे,” असं ते म्हणाले.
‘पोलिसांच्या बदल्यांचा नियम पाहिला तर साध्या पीएसआयची बदली करण्याचाही अधिकार गृहमंत्र्याला नाही. अस्थापना मंडळाचा तो अधिकार असतो. मी तीस वर्षे विधिमंडळात होता. या सर्वांची मला पुरेपूर माहिती आहे. मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी विरोधीपक्षाने हा कार्यक्रम राबविला आहे. अर्थात हा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठीही मोठी बुद्धीमत्ता लागते. देवेंद्र फडणवीस सध्या तेच करीत आहेत. माझ्यावेळीही असेच झाले होते. कोणाला तरी आरोप करायला लावला, नंतर तक्रारी झाल्या, मग चौकशी झाली. अर्थात चौकशीअंती यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले. मात्र, मधल्या काळात प्रचंड त्रास झाला. सध्याही असेच सुरू आहे,’ असं म्हणत खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘वर्षभर करोनामुळे जर पब आणि इतर सगळे बंद होते, तर पैसे गोळा करण्याचा संबंध येतोच कोठे? मात्र, फडणवीस यांना घाई झाली आहे. त्यांना आपण पुन्हा सत्तेवर येऊ असे वाटत आहे. त्यामुळे हे सर्व सुरू आहे. विरोधी पक्षाने त्यांचे काम जरुर करावे, मात्र राज्याच्या इतिहासात विरोधकांचे असे काम पाहिले नाही,’ असेही खडसे म्हणाले.