क्रूझवरील रेव्ह पार्टीवर धाड : शाहरुख खानच्या मुलांसह ८ जण NCB च्या ताब्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : एनसीबीने काल मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण दहा जणांना केलेल्या अटकेत २ महिलांचा देखील समावेश असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या दोन महिला या दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या मुंबई अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझवर छापा टाकला. या छापेमारीत MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरस सारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. २ महिलांसह ८ जणांवर अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सीआर ९४/२१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एनसीबीचे अधिकारी या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. मिळालेल्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे. दरम्यान आता एनसीबी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.