लग्नमंडपातूनच निघाली अंत्ययात्रा; तरुणीच्या अपघाती मृत्यूने हळहळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नागपूर (वृत्तसंस्था)। मुलीचे लग्न ठरल्याने घराचे रुपांतर लग्नघरात झाले. लग्नाचा दिवस जवळ येऊ लागताच घाई गडबड सुरू झाली. मात्र लग्नाच्या तीन दिवसांपूर्वीच काळाने या वागदत्त वधुवर झडप घातली. वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका अपघातात या तरुणीचा मृत्यू झाला. लग्नासाठी सजलेल्या घरातूनच तिची अंत्ययात्राच निघाली.
डॉ. नीलिमा सुखदेव नंदेश्वर (वय ३५, रा. परसोडी, उमरेड) हे तरूणीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अलीकडेच नागपुरातील एका डॉक्टर तरुणाशी त्यांचा विवाह ठरला होता. १० जानेवारीला हा विवाह होता. नीलिमा यांनी कृषी विषयात पी.एचडी. प्राप्त केली होती. आनंदवन वरोरा येथील आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. लग्नापू्र्वी महाविद्यालयातील काही कामे आटोपण्याच्या हेतूनेच त्या समुद्रपूरमार्गे वरोरा येथे जात होत्या. यावेळी त्यांची आई प्रभा, या त्यांच्यासोबत होत्या. या दोघी उमरेडवरुन अल्टो कारने समुद्रपूर येथून जात होत्या. नीलिमा स्वत: गाडी चालवित होत्या. समुद्रपूरजवळील पाईकमारी शिवारात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार उलटली. यात नीलिमा यांचा जागीच मृत्यू झाला. प्रभा यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नीलिमा यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांचा भाऊ अभियंता असून तो पुण्याला तर एक बहीण वसईला आहे. दुसरी बहीण त्यांच्यापेक्षा लहान असून ती उमरेड येथेच वास्तव्याला आहे. नीलिमा यांच्या लग्नासाठी सगळेच उमरेडला जमले होते. या घटनेमुळे नंदेश्वर कुटुंबीयांवर दु:खाच डोंगर कोसळला आहे.