दिव्यांग मुलानं जेवण मागितलं, रागवलेल्या हॉटेल चालकाने अंगावर गरम पाणी ओतलं
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी): समाजातील माणुसकी कमी होत असल्याच्या घटना आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास घडली आहे. भूकेने व्याकूळ झालेल्या भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं खाण्यासाठी अन्न मागितले असता रागवलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं आहे.
दिव्यांग मुलगा भीक मागून पोटाची भूक भागवत असतो. सोमवारी रात्रीच्या सुमारास तो शहरातील एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी जेवण मागण्यासाठी गेला. यामुळे राग आलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं. या घटनेमध्ये दिव्यांग मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
मुलाच्या अंगावर गरम पाणी ओतल्याची माहिती मिळताच शहरातील सामाजिक संघटना त्याच्या मदतीला धाऊन आल्या. जखमी झालेल्या मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अश्विनी आढाव आणि सुशील जाधव हे सामाजिक कार्यकर्ते त्या दिव्यांग मुलाच्या मदतीला धावून आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.