नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई कधी ? भोंग्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत हनुमान चालीसा वाजणारच– राज ठाकरेंचा इशारा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. एका दिवसापुरतं हे आंदोलन नाही. आमचं आंदोलन सुरूच राहणार. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार, असं सांगतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलचीही आठवण करून दिली.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मुंबईसह राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाहीत , तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार असा इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला आहे. तसंच अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवानगी देताय, कशासाठी, कोणासाठी देताय. हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरता नाही. दिवसभर जे 4 ते 5 वेळा बांग दिली जाते, जी लाऊडस्पीकरवरून देतात. ती जर परत त्यांनी दिली, तर आमची लोकं हनुमान चालीसा त्या-त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणार, अशा शब्दात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रभरातून आणि बाहेरुन ही आम्हाला फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. पण हे फक्त आमच्या बाबतीत का होत आहे? जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि करत नाही त्यांना मोकळीक देणार अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली. मशिदी आणि मंदिरांवरचे भोंगेही उतरवले पाहिजे. काल विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं इतक्या मशिदींना भोंग्यांसाठी परवानगी दिली. जिथे मशिदीच अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींना भोंगे लावण्यासठी सरकार अधिकृत परवाने देत आहे. ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. कशासाठी देता परवानगी? सकाळच्या अजानपुरता हा विषय नाही. दिवसातून चार ते पाच वेळा बांग दिली जाते. ती जर त्यांनी परत दिली. तर आमचे लोकं हनुमान चालिसा त्या त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
मशिदींवरील भोंग्याचं डेसिबल मोजलं जात नाही. डेसिबलचं उल्लंघन होत आहे. सुप्रीम कोर्ट काय करणार हे पाहतोय. एकदा निकाल दिल्यानंतर सरकार काही करत नसेल तर फायदा काय कोर्टाचा? कोर्ट काय करणार आहे? असा सवालही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचं असेल तर लोकवस्तीत 45 ते 55 डेसिबल आवाज लावू शकता तीही परवानगी घेऊन. तुम्ही 365 दिवसाची परवानगी कशी देता? आम्हाला एक दिवसाची, 10-12 दिवसांची लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाते. त्यांना 365 दिवसाची परवानगी कशासाठी? त्यांनीही रोज परवानगी द्यावी. 45 ते 55 डेसिबल म्हणजे घरातील मिक्सर एवढा आवाज. पोलिसांना एकच धंदा आहे का की डेसिबल मोजायचं. एकच काम आहे का?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला.