कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म : शिवसेना नेत्याचा पवारांवर निशाणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रायगड, वृत्तसेवा । राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सर्वच आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांची घुसमट होतं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीकेचा बाण डागला आहे.शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला. ते रायगडमध्ये बोलत होते.श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं.उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असंही अनंत गीतेंनी नमूद केलं.
अनंत गीते नेमकं काय म्हणाले –
मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. अनंत गीतेचा पवारांवर निशाणा– ‘आज तुम्हाला आदेश देणार आहे. जरी राज्यात आघाडी सरकार असलं, तरी आम्ही आघाडी सैनिक नाही. शिवसैनिकच राहणार आहोत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. दुसरा कुठलाही नेता मग त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत. त्याला कुणी जाणता राजा म्हणो… कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू फक्त बाळासाहेब ठाकरे!’
राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला
दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले. ‘तुम्हाला आघाडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचा गाव सांभाळायचा आहे. तुमची ग्रामपंचायत सांभाळायची आहे. तुमची जिल्हा परिषद सांभाळायची आहे. राज्यात काय करायचं ते नेते बघून घेतील. ते समर्थ आहेत बघायला. तुम्हाला मला चिंता करायचं कारण काय? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही.’
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा