राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल, सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका लॉकडाउनमुळे लांबलेल्या होत्या या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, राज्य सरकारने एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे.
सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत 8 जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत ही आधी होत असते. पण यात घोडेबाजार होणार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.