एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत सोडलं मौन; म्हणाले…
जळगाव (प्रतिनिधी)। भाजपा नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र शुक्रवारी दुपारी जळगावात असताना खडसेंनी ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स’ असं उत्तर देत या विषयाचे खंडन केले. ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत’, असेही ते यावेळी म्हणाले.
नाथाभाऊ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत”.
बोरखेड्यातील घटना दुर्दैवी-
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या निर्घृण हत्येच्या घटनेसंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या”.
जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी-
“जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत मी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण काहीएक उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे,” असा आरोपही खडसेंनी केला.