एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले ! ‘शिवसेना बाळासाहेब’ असे नाव
गुवाहाटी, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मागच्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा आज क्लायमॅक्स समोर आला आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने आपलं अधिकृत नाव जाहीर केलं आहे. ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं या गटाचं नाव असल्याचा दुजोरा आ.दीपक केसरकर यांच्याकडून देण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केलं आहे. शिवसेनेचे 38 आणि अपक्ष असे 50 आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाचं नाव आता ठरलेलं आहे.
“शिवसेना बाळासाहेब” असं गटाचं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. एकत्र निवडणुका लढवूनही आपण भाजपापासून दूर झालो, तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? पण तरी उद्धव ठाकरेनी घेतलेला निर्णय मान्य केला. पण जेव्हा शिवसेनेचं अस्तित्वच संपवायला आपले मित्रपक्ष निघाले, तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही भूमिका मांडली आहे. ती उद्धव ठाकरेंना सातत्याने सांगितली आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
आज संध्याकाळी याबाबतची पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या नावाला ठाकरे परिवार, शिवसेना आक्षेप घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबतची लढाई आता न्यायालयात जाणार असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्तासंग्रामाला शनिवारीही हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.