सरकार अल्पमतात, तात्काळ बहुमत परीक्षण घ्या– राज्यपालांना भाजपचे पत्र
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथी होणार असल्याचे संकेत मिळत असून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं परीक्षण करण्याच्या पत्र दिल्यानंतर राज्यातले महाविकास आघाडी सरकार महासंकटात सापडल्याचे बोलले जात आहे.
फडणवीस यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यपाल आज ना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने आज उघडपणे आपली भूमिका राज्यपालांकडे मांडली. काही अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे नमूद केले होते. त्यानुसार फडणवीस यांनी सरकार अल्पमतात आल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्यपालांना आज भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यातील आताची परिस्थितीचा उल्लेख केलाय. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. शिवेसनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांना राहायचं नाही. अशावेळी ठाकरे सरकारकडे बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे बहुमत चाचणीची मागणी आम्ही राज्यपालांकडे केलीय. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे.
राज्यपाल आता काय आदेश देणार, याची उत्सुकता आहे.आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. तसेच जे बंडखोर आमदार गुवाहटी येथे आहेत, ते मुंबईत विशेष अधिवेशनासाठी येणार का, याची उत्सुकता आहे. तसेच ज्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे का त्यांना मतदानाची संधी मिळणार का, याचेही औत्सुक्य राहणार आहे.