पहाटेच्या शपथविधी बाबत अजित पवार हात जोडून म्हणाले, “…तर तुम्ही धन्यच आहात”
सांगली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या गेल्या काळातील पहाटेच्या शपथविधीची आठवणही करुन दिली. मात्र याचसंदर्भात आज सांगलीमध्ये अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी हात जोडून या प्रश्नावरुन चिडलेल्या स्वरात उत्तर दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना अजित पवारांचा थेट उल्लेख टाळला असला तरी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत त्या प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधला. “आम्ही काँग्रेससोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. आम्ही जे केले ते उघडपणे केले. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
पहाटेच्या शपथविधीचा मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये उल्लेख केल्याचं विचारलं असता अजित पवारांनी चिडलेल्या स्वरातच पत्रकारांना उत्तर दिलं. “मी त्या वेळेस सांगितलेलं आहे मला वाटेल त्यावेळेस सांगेन, आता मला वाटत नाही सांगावंस, संपला विषय. मी तेव्हाच स्पष्ट केलं आहे. तुम्ही कितीही घोळून विचारलं तरी जोपर्यंत अजित पवारच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. आता तो विषय एवढा महत्वाचा आहे का? झालं अडीच वर्ष पाणी वाहून गेलं. सरकार आलंय सगळे व्यवस्थित काम करतायत,” असं अजित पवार म्हणाले.
आम्ही नाही अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी भाषणात काढली असं पत्रकारांनी म्हटलं. त्यावर बोलताना अजित पवारांनी, “ठीक आहे अशी कोणाला तरी कधीतरी आठवण येते. आणि दुर्देव हे आहे की पहाटे, पहाटे पहाटे… तुमच्यामध्ये जर सकाळी आठला पहाटे म्हणत असतील तर तुम्ही धन्यच आहात सगळे जण,” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांसमोर हात जोडले. पुढे बोलताना, “आठ वाजता तो शपथविधी झाला. आमच्यामध्ये आठला पहाट म्हणत नाही. आमच्यामध्ये पहाट पाचला, चारला म्हणतात,” असं उत्तर दिलं.