“वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”चित्रा वाघ कडाडल्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी)। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असं चित्रा वाघ म्हणाल्या .
“पूजा चव्हाणची आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात ज्या काही अपडेट येत आहेत ते व्हायरल होत आहे. काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. त्या सर्व क्लिप धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोख मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. भाषणात महिला सुरक्षेवर बोलणं सोपं असतं. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात ? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.