“मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला…”; राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार नव्हे, माझा स्वाभिमान– संभाजीराजें
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या संभाजीराजे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी मला दिलेला शब्द मोडला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
“मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं ते म्हणाले.
जे मी आता बोलणार आहे…. ते माझ्या तत्वात नाही…. पण मी बोलणार आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याजवळ आपण दोघांनी जावं आणि संभाजीराजे खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगावं. मुंबईत आल्यावर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले. या दोघांनी मला सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि उद्या तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी सरळ सांगितलं की, मी निवडणूक अपक्ष लढणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला प्रस्ताव होता की, शिवसेनेत प्रवेश करावा. मी सांगितलं मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेशाला नकार दिला असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
या निवडणुकीच्या समोर मी जाणार नाही… पण ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे यांनी पुढे म्हटलं, मी सर्व पक्षांना विनंती केली होती की, माझी कार्यपद्धती पाहून आपण सर्वांनी मला मदत करावी. माझी अजिबात कुणावरही नाराजी नाहीये. मी आता मोकळा झालोय स्वराज्य संघटीत करण्यासाठी. मला कोणत्याही पक्षाचा द्वेष नाही. मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे. माझी ताकद 42 आमदार नाहीत तर जनता आहे. आता स्वराज्य संघटना मजबूत करणार आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाटी सज्ज आहे.
“ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे”, असं संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.