बिग ब्रेकिंग : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, पक्षाचं नावही वापरता येणार नाही
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. याबाबत निवडणुक आयोगाने खूप मोठा निर्णय दिला असून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही.
उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. शिवसेनेची शान असलेला धनुष्यबाण आता कुणालाही वापरता येणार नाही, एवढंच नाही तर शिवसेना पक्षाचं नावही वापरता येणार नाही. असं असलं तरी हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.येत्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून याठिकाणी उमेदवारच दिला जाणार नाही, त्यामुळं शिंदे गटाला तसाही या निर्णयाचा विशेष फटका बसणार नाही. ठाकरे गटाला मात्र हा मोठा झटका आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीआधीच शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे. त्यामुळे आता कोण कोणतं चिन्ह घेऊन लढतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.