भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्ब ने शिवसेनेत खडबड
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन:
मुंबई, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
तुटण्याआधी जुळवून घेतलेलं बरं–
पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
काही अधिकाऱ्यांचीही हातमिळवणी–
एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेवून फक्त आपल्या मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्रं आहे. शिवाय महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्राशी नकळत छुपी हातमिळवणी करताना दिसत आहे, असा दावा त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
दोन्ही काँग्रेसला मोठं करण्यासाठी महाविकास आघाडी का?
गेल्या दीड वर्षात मी आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीच कामे कशी झटपट होतात, आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही? असा सवाल केला आमदारांमधून केला जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी पसरली आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. पण युती तोडून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का? अशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे. त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका केसमधून जामीन मिळाला तर जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवले जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये अडकवले जात आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. भाजपशी जुळवून घेतलं तर हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही त्यांनी मांडली आहे. युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुद्धा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळत नसताना, कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेल्या सात महिन्यांपासून लढत आहे, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा