भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर चंद्रकांत पाटील म्हणतात, “शपथविधी झाल्यानंतरच कळेल !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे (समिर देशमुख)। भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनकडुन करण्यात आलं. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे अंदाज कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. तुमच्याकडूनही हेच अंदाज समजत आहेत. परंतु जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा पहाटेच्या शपथविधीसारखं नंतर कळेल, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा धुरळा उडवून दिला.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र, भेट झाली की नाही याबाबत मला काही माहित नाही. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत मी काही सांगू नाही शकत. चर्चा तर होतच आहेत. परंतु, सध्याची तशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे श्रेष्ठी निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे ठरेल तेव्हा कळेल’,असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असं ते म्हणाले असते. पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही, असंही ते म्हणाले. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून हे चित्रं कमी झालं आहे. विरोधी पक्ष म्हणजे दुश्मनच असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु, काही असलं तरी राजकीय भेटी घेण्यात काही वावगं नाही, असंही ते म्हणाले. भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असं सूचक विधानही त्यांनी केलं.