पुण्यात आत्महत्या केलेल्या तरुणीचे राज्यातील मंत्र्यासोबत कनेक्शन; भाजप आक्रमक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे (वृत्तसेवा)। सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मूळची बीडची असलेली २२ वर्षीय पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं आहे. चर्चेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आत्मह.त्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आतापर्यत कोणत्याही नावाचा उल्लेख झाला नाही. मात्र भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी थेट ‘राठोडगिरी’ म्हणत सरकारवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे भाजपच्या महिला अध्यक्ष अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक मुलगी शिकण्यासाठी पुण्यात येते आणि अचानक आत्महत्या करते हे संशयास्पद आहे. तिला असा कुठला त्रास होता? तिच्यावर कोणाचा दबाव होता का? कुणी तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं का? या प्रकरणात एका मंत्र्याचं नाव पुढं येतंय. पोलिसांनी याचा तपास करायला हवा,’ अशी मागणी अर्चना पाटील यांनी केली आहे.