रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू : ८० ते ९० जण मातीच्या ढिगाऱ्याखाली
Monday To Monday NewsNetwork।
महाड, मंडे टू मंडे वृत्तसेवा: महाडच्या तळीये मधलीवाडी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल ही घटना घडल्यानंतर आज सकाळी एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दुसरी टीमही हेलिकॉप्टरने तळीयेला पोहोचली आहे. मात्र, तळीयेमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून हेलिकॉप्टरला लँडिंगसाठी जागाच मिळत नसल्याने मदत कार्यात मोठा खोळंबा होत आहे.
महाडमध्ये मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडली आहे. तळई गावावर दरड कोसळली आहे. काल संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. तुफान पावसामुळे ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. संध्याकाळच्या सुमारास तुफान पाऊस सुरु होता. याच पावसात तळई गावातील ३५ घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ३२ लोकांचा जागीच मृत्यू झालाय तर ८० ते ९० लोकं मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे.
महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान गावात जाणाऱ्या रस्त्यांवर ९ फुटांपर्यंत पाणी असल्याने ते कमी झाले की बोटींतून पोहोचण्याचा प्रयत्न करू, असे एनडीआरएफच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधून मधून पावसाचा जोर कायम असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.