माफी मागा अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं थोबाड रंगवू, चाकणकरांचा दरेकरांना इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा। लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. यावर टिपणी करतांना ’गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असे भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपाहय भाषेमुळे वाद निर्माण झाला. यावरच आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ‘दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं प्रवीण दरेकर यांना इशारा दिलेला आहे.
राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चाकणकर यांनी म्हटलं आहे की, प्रवीण दरेकर तुम्ही जे वक्तव्य केलं आहे त्यावरुन असे वाटत आहे की, वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. तुम्ही जे वाक्य म्हणालात ते मला उच्चारताना लाज आणि संकोच वाटत आहे. पण घेणं नाईलाज आहे. आपण म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. आपण महिलांबद्दल बोलत असून महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकत आहे ती वैचारिकतेची दरिद्रता दाखवून देत आहे. तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या कैवारी असल्याचे दाखवत आहेत त्यांची मला कीव वाटत आहे. ज्या पक्षाचा विचार असा आहे त्या पक्षात या महिला काम करत आहेत. तुमच्या वक्तव्यावरुन पक्षाची संस्कृती दिसून येत आहे. तुम्ही या विधानाबद्दल माफी मागावी नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाड रंगवू शकतो असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.