वेळ आल्यावर माकडीणही पिल्लाला बुडवते, आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू; शिवसेना खासदाराचे विधान
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
परभणी, वृत्तसंस्था। जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या नाट्यावरून शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार काय? अशी जोरदार चर्चाना पुन्हा हवा मिळाली आहे.
खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
“आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असं जाधव म्हणाले होते.
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. 13 जुलै रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. विशेष म्हणजे परभणी येथे रुजू होण्यासाठी आंचल गोयल 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या. त्यामुळे मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी गोयल पदभार घेणे अपेक्षित होते. मात्र नियुक्तीच्या दिवशीच गोयल यांना मुंबईत परत बोलवण्यात आल्याने त्या पदभार न स्वीकारता परतल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार देण्यात यावा, अशा आदेशाचे पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले. त्यानंतर काटकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या, अशी चर्चा जिल्हाभरात रंगली होती.