रुग्णालयात बेड शिल्लक नाही? महिलेला रस्त्यावर झाडाखील लावला ऑक्सिजन !
औरंगाबाद । औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे एका महिलेला चक्क रस्त्यावर झाडाखील ऑक्सिजन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार केले जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र, राज्य सरकारचा हा दावा फोल ठरल्याचं एका घटनेवरून समोर आलं आहे.
सविस्तर माहिती अशी की, वाळूज परिसरातील गरवारे कम्युनिटी सेंटरच्या बाहेर रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित महिलेला आता घाटी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच महिलेच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. याशिवाय महिलेच्या घरातील इतर सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. विशेष म्हणजे कोविड सेंटरमध्ये 40 बेड उपलब्ध असतानाही महिलेला बेड देण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. महिलेची प्रकृती ढासाळत होती. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जात होती. तोपर्यंत झाडाखालीच ऑक्सिजन लावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, आरोग्य प्रशासनाकडून झालेल्या या बेजबाबदार कृतीचा नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळेच कोरोनाबाधित आजींना झाडाखाली ऑक्सिजन लावण्याची वेळ आल्याचा आरोप समाजातील सुज्ञ नागरिकांनी केला आहे.