सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका पुन्हा लांबणीवर, सरकारचे नवीन आदेश जाहीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी)। कोरोनाचा राज्यातील वाढता आकडा पाहता २५० पेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय़ शासन पातळीवर करण्यात आला आहे.
ज्या संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या नाहीत, अशा निवडणुका घेण्याबाबत शासनाच्या कोव्हिड १९ संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत निवडणूका घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लवकरच २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीबाबतचे नियम शासन स्थरावर निश्चित करण्यात येणार आहेत. हे नियम निश्चित झाल्यानंतरच या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात यावा असे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
याआधीही कोरोनाचे देशातले वाढते संक्रमण पाहता याआधीच चार वेळा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता नवीन आदेशान्वये या निवडणुका ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर १६ जानेवारीचे आदेश रद्द करून शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. पण पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता राज्य सरकारकडून या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही असे शासनाने निश्चित केले आहे.