थरारक; आश्रमात घुसून महाराजांवर ८ अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला
औरंगाबाद (वृत्तसंस्था): जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या राधा गोविंद सेवा मिशन आश्रमातील प्रियशरण ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर महाराजांवर (वय-61) अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण करता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, प्रियशरण महाराज व त्यांचे साधक रात्री झोपलेले असताना बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांच्या सेवा आश्रमाच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. काही न बोलता महाराज व त्यांच्या साधकांना जबर मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला. महाराजांच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार करत मारहाण केली. त्यानंतर सदर घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर बुधवारी सकाळी श्वान पथक व स्थानिक गुन्हेे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु कुठलाही माग निघाला नाही. हल्लेखोरांनी आश्रमातील कुठल्याही वस्तूला हात लावला नाही. तसेच कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही. यामुळे सुडीच्या उद्देशाने हल्ला केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हल्लेखोरांनी आश्रमात घुसून महाराज व त्यांच्या साधकांना गंभीर मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जखमी महाराजांवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घेतलेल्या जबाबाच्या आधारे प्रियशरण महाराजांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.