हिंदूविरोधी बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही- विश्व हिंदू परिषदेची टीका !
मुंबई (वृत्तसंस्था)। राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषदेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यांच्याप्रमाणे काही राजकारण्यांनी रामजन्मभूमीशी संबंधित कुठल्याही विषयावर हिंदूविरोधी वक्तव्य करण्याचा व्यवसाय चालविला आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हिंदूविरोधी बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही,’ अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी गुरुवारी केली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर उभारल्याने करोना जाणार का, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना परांडे म्हणाले,‘राम मंदिर हे राष्ट्रीय स्वाभिमानाचे, सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराबाबत निर्णय दिला आहे. कार्यक्रमाला विरोध करणारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही ही मंडळी हिंदूविरोधी वक्तव्य करत असल्याने त्यांची मानसिकता प्रत्येकाने समजण्याची गरज आहे. हा कार्यक्रम हिंदूहिताय आहे. कुणाच्या विरुद्ध नाही. मात्र, हेतूपूर्वक हिंदूहितविरोधी बोलून अडथळे आणण्याचा प्रयत्न काही जण करत असतात.’ पत्रपरिषदेला विहिंपचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, प्रांतमंत्री गोविंद शेंडे उपस्थित होते.
राम मंदिर भूमिपूजन सोहळा ऑनलाइन घेण्याची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ‘ठाकरेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. कार्यक्रम ठरलेल्या स्वरुपातच होणार आहे. करोना असतानाही दारूची दुकाने सुरू आहेत. सर्व कार्यालयांचे कामकाज होत आहे. मग, भूमिपूजन सोहळा ऑनलाइन का म्हणून घेण्यात यावा? दोनशे लोकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सोहळा केल्याने काय बिघडणार आहे,’ असा सवाल परांडे यांनी उपस्थित केला. खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे मोदींनी सोहळ्याला जाऊ नये, असे वक्तव्य केले आहे. त्यावर बोलताना परांडे म्हणाले,‘हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही. ओवेसी यांनी स्वत: धर्मनिरपेक्षताचा अभ्यास करायला हवा.’