मोठी बातमी ; आदेश अखेर निघालाच, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता या महिन्यापासून बंद करण्यात येणार असून त्यासंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना सप्टेंबर २०२२ च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नये, अशी स्पष्ट सूचना केली असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबाद तालुक्यातील अनेक शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याचे आ. प्रशांत बंब यांनी विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली होती. अनेक शिक्षक संघटनेने यास विरोध केला मोर्चा काढला पंरतू आ. प्रशांत बंब हे शिक्षकांनी मुख्यालयी राहावे, फुकटचा घरभाडे भत्ता देण्यात येवू नये या आपल्या भुमिकेवर ठाम असून त्यांनी मंगळवारी यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुध्दा भेट घेवून शालेय शिक्षणाबाबतची दुरावस्था बाबत पत्र दिले आहेत.
अखेर आदेश निघालाच
दरम्यान, खुलताबादचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विलास केवट यांनी मंगळवार दि. ६ रोजी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, शासन निर्णयाप्रमाणे शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे . तसेच विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांच्या पत्रानुसार तालुक्यातील कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने तक्रारी प्राप्त होत आहेत, असे लेखी कळविले आहे . त्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बाबत अद्यापपर्यंत पुरावे सादर केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करण्यात येऊ नये, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर यांनी संदर्भीय पत्राद्वारे कळविले आहे.
या महिन्यांपासून होणार बदल
मुख्याध्यापकांनी संबंधीताचे माहे सप्टेंबर-2022 चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करु नये. तसेच मुख्यालयात राहत नसलेबाबत निदर्शनास आल्यास नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे नमुद केले आहे. चुकीची माहिती देणारे मुख्याध्यापक यास स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावे, असे कळविले आहे. त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांत नाराजी पसरली आहे.